
इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजीतील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणण्यासह पंचगंगा नदी गाळमुक्त करणे आणि शहरातील विविध विषयासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच शहराच्या विकासाला आणखीन गती मिळणार आहे.
इचलकरंजी शहराला सातत्याने भेडसावणारा महापूराचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात यावा यासाठी पंचगंगा नदीतील गाळ काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नदी पात्रातील काढण्यात आलेला गाळ आणि कमानीच्या यशोदा पुलामुळे यंदा महापूराचा प्रश्न बर्याच प्रमाणात कमी झाला. त्यामुळे भविष्यातील विचार करता पंचगंगा नदी पात्रातील गाळ काढल्यास महापूराचा प्रश्न संपुष्टात येऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळता येणार आहे. त्याचबरोबर शहरात विविध भागात असलेली शासकीय कार्यालये ही एकाच इमारतीत आणण्यासाठीही आमदार आवाडे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

सध्या विविध शासकीय कामांसाठी विविध ठिकाणी नागरिकांना फिरावे लागते. ही सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत झाल्यास त्याचा मोठा लाभ नागरिकांसह शासकीय अधिकार्यांनाही होणार आहे. इकडून तिकडे येण्या-जाण्याचा वेळही वाचणार असून कामाला गती मिळणार आहे.
यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबतही चर्चा संदर्भात आमदार आवाडे यांच्या मागणीवरुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, सह. आयुक्त (न.पा. प्रशासन, कोल्हापूर), कार्यकारी अभियंता, अपर तहसिलदार व संबंधित अधिकार्यांची बैठक झाली.
या बैठकीत सर्वच विषयांवर सर्वांगिण चर्चा करण्यात आली असून लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासाठी आमदार आवाडे हे प्रयत्नशील आहेत. त्यातून शहराच्या विकासाला आणखीन गती मिळणार आहे.



