Homeराजकीयनागरी वस्तीवरील मैदानाचे आरक्षण रद्द झाल्याने नागरिकांचा आनंदोत्सव

नागरी वस्तीवरील मैदानाचे आरक्षण रद्द झाल्याने नागरिकांचा आनंदोत्सव

इचलकरंजी/प्रतिनिधी –

येथील गट नं. 78 (रि.स.नं. 23973) या  लोकवस्तीच्या ठिकाणी महानगरपालिकेने नव्या प्रारुप विकास आराखड्यात टाकलेले खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करुन ते निवासी क्षेत्र ठेवण्यात आले आहे. सव्वावर्षापूर्वी केलेल्या आंदोलनास मिळालेल्या या यशाचा परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली साखर वाटून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. हे संपूर्ण यश माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांचे असून त्यांच्यामुळेच आमची घरे सुरक्षित राहिली आहेत. अन्यथा आम्हांवर बेघर होण्याची वेळ आली असती, अशा प्रतिक्रिया भागातील नागरिकांतून व्यक्त होत होत्या.

कबनूर-इचलकरंजी भागातील गट नं. 78 याठिकाणी अनेक वर्षांपासून 250 कुटुंबे वास्तव्यास आहेत. ते सर्वजण नियमित घरफाळा, पाणीपट्टी आदी सर्व कर भरतात. परंतु महानगरपालिकेने जारी केलेल्या नव्या प्रारुप विकास आराखड्यात या निवासी क्षेत्रावर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले होते. तर याच परिसरात खेळाचे मैदान असताना त्यावर दुसरेच आरक्षण टाकले होते. चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आलेले हे आरक्षण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. प्रशासनाच्या अजब कारभाराचा निषेध करत आंदोलकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच क्रिकेट खेळत निषेध नोंदविला होता. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने टाकलेले आरक्षण रद्द न केल्यास कॉ. मलाबादे चौकासह महानगरपालिकेत विविध खेळांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

सव्वा वर्षापूर्वी केलेल्या आंदोलनास यश मिळून क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करुन निवासी क्षेत्र कायम ठेवल्याबद्दल भागातील नागरिकांनी साखर वाटून  व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नितेश पोवार, बंडू मुळीक, मेहबूब शेख, शहानूर कमालशा, आरिफ मुजावर, प्रदीप रोडे, विदेश हजारे, रफिक फकीर, बाळू मुजावर, सलीम मुल्ला, संतोष काटकर, क्रिकेट असोशिएशनचे राहुल खामकर, इम्तियाज फकीर, अनिल रावळ, सुहास लेंडवे, संतोष पाटील, विनोद स्वामी, राजू साठे, नितीन बावधनकर, नरेंद्र आंबोले, प्रशांत साळुंखे यांच्यासह भागातील क्रिकेटप्रेमी, युवक, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular