इचलकरंजी –
येथील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीप्रमाणे असलेले बेघर वसाहत चे आरक्षण रद्द करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून व सामाजिक कार्यकर्ते इम्रान डफेदार यांनी केलेल्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भागातील नागरिकांनी पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग २ मधील गट क्र. २२४ या भागावर दहा वर्षांपासून ‘बेघर वसाहत’ चे आरक्षण टाकण्यात आलेले होते. परंतु या जागेवर अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कुटुंबे वास्तव्यास असल्याने हा दाट लोकवस्तीचा भाग बनला होता होता. परंतु बेघर वसाहत आरक्षामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. भागातील विकासकामे प्रलंबित राहणे, बांधकाम अथवा नुतनीकरणासाठी आवश्यक परवाना न मिळणे तसेच परिसरातील योजनांची अंमलबजावणी रोखली जाणे यामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन भागातील इम्रान डफेदार यांनी स्वतः पुढाकार घेत येथील बेघर वसाहत आरक्षण रद्द करावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शिवाय वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनेही करण्यात आली होती. या संदर्भात डफेदार यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत या आरक्षणामुळे या भागातील नागरिकांची होणारे नुकसान व बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे समजावून सांगितले. त्यानुसार आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळून ‘बेघर वसाहत’ आरक्षण पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासूनची मोठी अडचण दूर झाल्याने नागरिकांनी साखर पेढे वाटत जल्लोष साजरा केला. आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा आणि इम्रान डफेदार यांच्या प्रयत्नातून बेघर होण्यापासून सुटका झाली अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. आरक्षण हटल्याने आता प्रभागातील विकासकामांना गती मिळून परिसराच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
याप्रसंगी रसुल मुल्ला, रवी बिरादार, प्रधान माळी, रजाक मुल्ला, यशवंत दाडमोडे, दीपक कडोलकर, गिरीश जाधव, रोहित भराटे, तौफिक मुल्ला, इम्रान बागवान, जकारीया शिरोळे, मोहसीन जकाती, प्रदीप कदम, जुबेर आलासे, मोहसीन नदाफ यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




