इचलकरंजी
इचलकरंजी शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण) चे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्यावर मुद्यावर बोलताना केली.
औचित्याच्या मुद्यााद्वारे सभागृह आणि शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधताना आमदार राहुल आवाडे यांनी, इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील हे मोठे औद्योगिक शहर आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने इचलकरंजी शहर व परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. शहराचा औद्योगिक पसारा वाढत असतानाच अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यातूनच शहर आणि परिसरात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, हाणामारी असे गुन्हे घडत असून गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे. यापूर्वी शहरात एलसीबी चे स्वतंत्र कार्यालय कार्यरत होते. त्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासह गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला होता. परंतु काही वर्षापूर्वी इचलकरंजीतील एलसीबी चे कार्यालय बंद करण्यात आले आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरात वाढणारी गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी इचलकरंजीत एलसीबी चे चे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरु करण्याची गरज आहे.
एलसीबी चे कार्यालय सुरु झाल्यास सराईत गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यांवर कडक नजर ठेवणे शक्य होईल. त्याचबरोबर प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून याठिकाणी एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.





