इचलकरंजी –
इचलकरंजी शहरातील महावितरण कंपनीच्या आवाडे सब स्टेशन आणि आमराई सब स्टेशन या दोन्ही वीज मंडळ कार्यालयातून परिसरातील शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी आता शेतकर्यांना रात्रभर जागावे लागणार नाही. माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्य्नत होत आहे.
सर्वात मोठा रोजगार अन् अन्नधान्याची निर्मिती शेतीतून होते आणि शेतकर्याला जगाचा पोशिंदा असे संबोधले जाते. पण शेतातील पिकासाठी आजपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांची वाढ वेळेत व्हावी, ती कोमजून जावू नयेत अथवा हातातोंडाला आलेले पिक वाय जावू नये यासाठी त्यांना पाण्याचा पुरवठा वेळेत व्हावा लागतो. त्यासाठी शेतकर्यांना शेतातील पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्रभर जागत व तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी प्रदीर्घकाळापासून वारंवार केली जात आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने प्रयत्न सुरु होते.
याच अनुषंगाने माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने महावितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरु होता. त्याला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आवाडे सब स्टेशन आणि आमराई सब स्टेशन या दोन्ही ठिकाणाहून शेतीसाठी आता सकाळच्या सत्रात वीज पुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्गातून आमदार आवाडे यांचे अभिनंदन केले जात आहे.
ब्रेकिंग



