इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथं शक्य आहे तिथं महायुती म्हणून एकत्र लढायचे आहे. पण जिथं महायुती जुळणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी चर्चा गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे उपस्थित होते.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. त्यासंदर्भात बुधवारी नामदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्यात कोल्हापूरातील आवाडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
यावेळी महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून पहिला महापौर आपलाच करण्याचा निर्णय झाला. तर जागा वाटपाबाबत चर्चेत ज्याठिकाणी महायुती म्हणून शक्य आहे त्याठिकाणी एकत्र लढायचे तर ज्याठिकाणी महायुती शक्य होणार नाही त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्यावर चर्चा झाली. जागा वाटप संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन फॉर्मुला निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.





