प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महासत्ता चौक परिसरातील रस्ता रुंदीकरण संदर्भात शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली. यावेळी त्यांनी या कामातील अडचणींची माहिती जाणून घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली. या कामामुळे या चौकातील सातत्याने भेडसावणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.
राजवाडा चौक ते महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी सतत वाहतूक कोंडीसह अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. रुंदीकरणात अडथळा होणारी चौकातील अतिक्रमणे मध्यंतरी महापालिकेच्या वतीने काढण्यात आली आहेत. तर उर्वरित अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. नेहमीच वर्दळीचा असलेल्या या चौकामध्ये अनेक झाडे आहेत. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.
आमदार आवाडे यांनी पाहणी केल्यानंतर रुंदीकरण व सुशोभिकरण कामात अडचण ठरत असलेली अनावश्यक झाडे काढण्यात यावीत, अशा सूचना महापालिकेला दिल्या. प्रलंबित असलेल्या या चौकाचे रूंदीकरण झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी तसेच संजय केंगार, श्रेणिक मगदुम, राहुल घाट, सीमा कमते आदी उपस्थित होते.







